मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील स्पर्धेप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात विविध क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव अर्थात नमो चषक स्पर्धेचे आयोजन जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या आयोजनाबाबत मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली नियोजन बैठक झाली.
उलवे नोडमध्ये झालेल्या या बैठकीस टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, किशोर पाटील, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, मयूर कदम, विवेक होन, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत विविध स्पर्धा समितीच्या पदाधिकार्यांना सूचना केल्या. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, सीएम चषक, त्यानंतर मागील वर्षी नमो चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंना वाव देणार्या ठरल्या. नमो चषक 2024 स्पर्धा राज्यातील प्रत्येक तालुक्यात झाली. त्या स्पर्धेत पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख 13 हजार 278 स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता. मागील नमो चषक महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा 21 प्रकारात स्पर्धा झाल्या.
नमो चषक 2025 स्पर्धा अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात होणार आहे. विविध स्पर्धांसोबत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व नमो चषक स्पर्धेचे यंदाही योग्य नियोजन व यशस्वी आयोजन झाले पाहिजे यासाठी प्रत्येक समितीने आपापल्या समितीचा नियमित आढावा घ्यावा, अशी सूचनाही मुख्य आयोजक परेश ठाकूर यांनी समित्यांना या बैठकीच्या माध्यमातून केली.