Breaking News

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सगळ्यांनी उचलण्याची आवश्यकता आहे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे प्रतिपादन

रोहे : प्रतिनिधी

परिवहन विभागाचे स्कूल बसवर लक्ष आहेच परंतु शाळा, मुख्याध्यापक, पालक, चालक यांचेही स्कूल बसवर नियंत्रण आवश्यक आहे, असे प्रतिपादन पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी धाटाव येथे केले.

रस्ता सुरक्षा अभियान 2022 अंतर्गत पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रोहा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धाटाव येथील एम. बी. मोरे स्कूल येथे शालेय विद्यार्थी सुरक्षित वाहतूक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात महेश देवकाते मार्गदर्शन करीत होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सगळ्यांनी उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

रोह्याच्या गटशिक्षणाधिकारी अधिकारी मेघना धायगुडे यांनी प्रास्ताविकात स्कूल बस व स्कुल बस समितीच्या कामाविषयी माहिती दिली. प्रत्येक शाळेने परिवहन समिती गठीत करणे अनिवार्य आहे. या समितीच्या माध्यमातून शालेय वाहतूक सुरक्षीत करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच स्कुल बसची कागदपत्रे, विमा, पीव्हीसी, परवाना आदींची शाळेच्या परिवहन समितीने तपासणी करणे गरजेचे आहे, असे मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे यांनी या वेळी सांगितले.

रोहा एसटी आगर प्रमुख सोनाली कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सोनी जवाते, एम. बी. मोरे फाउंडेशनचे संचालक अशोक मोरे, प्राचार्य प्रसन्न म्हसाळकर, मुख्याध्यापिका सुनीला आंग्रे, पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निरीक्षक दिनेश शर्मा, उपनिरीक्षक दिग्विजय कोळी, मंगेश चौधरी, शिक्षण विभागाचे मिलींद पाटील यांच्यासह रोहा तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, स्कुल बस चालक, मालक, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि पालक या वेळी उपस्थित होते. मानसी कदम यांनी आभार मानले.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्तखारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत बास्केटबॉल स्पर्धेचेआयोजन करून करण्यात आले.तरुण …

Leave a Reply