Breaking News

विवेक पाटलांसह संपूर्ण संचालक मंडळच जबाबदार

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका…
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील संपूर्ण घोटाळ्यापासून वाचण्याचे शर्थीचे प्रयत्न शेकाप नेते आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह 15 संचालकांनी केले असले तरी सहकार कायद्यानुसार या संपूर्ण घोटाळ्याला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांसह संबंधित अधिकारी जबाबदार ठरतात. त्यामुळे सहकार खात्याला कोणतेही जबाब दिले तरी ही सर्व मंडळी वैयक्तिक आणि सामुदायिकरीत्या या सर्व गैरप्रकाराला जबाबदार ठरत असल्यामुळे या सर्वांनाच चौकशीला तसेच पुढील कारवाईला सामोरे जावेच लागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे राज्याचे सहकार खाते आणि गृहखाते काय भूमिका घेते, याकडे कर्नाळा बँकेचे सामान्य सभासद, खातेदार, ठेवीदार आणि रायगडवासीयांचे लक्ष लागले आहे.
सहकार खात्याच्या सध्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी आणि चौकशी व कारवाईचा वेळ लांबविण्यासाठी या सर्वच संचालकांनीही एकसारखे जबाब रायगड जिल्ह्याच्या विशेष लेखा परीक्षकांकडे नोंदविले आहेत आणि त्या जबाबासोबतच बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनीही आपणच या प्रकरणाला जबाबदार असल्याचा जबाबही प्रत्येक संचालकाच्या जबाबाखाली जोडला आहे.
याबाबतची सविस्तर कहाणी ‘राम प्रहर’च्या वाचकांसाठी देत आहोत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेची निवडणूक 28 मे 2015 रोजी झाली. तेव्हा विवेक पाटील यांच्यासह उपाध्यक्ष सुभाष मधुकर देशपांडे आणि संचालक म्हणून भालचंद्र रामभाऊ तांबोळी, मच्छिंद्र कृष्णा नाईक, विष्णू चिंतू म्हात्रे, डॉ. आरिफ युसूफ दाखवे, रामचंद्र धोंडू पाटील, अभिजित विवेकानंद पाटील (विवेक पाटील यांचा मुलगा), धर्मराज उंदू नाईक, रवींद्र श्रावण चोरघे, सदाशिव महादू वाघ, सौ. पूनम प्रकाश वाझेकर, सौ. शालिनी शंकर ठाणगे, सौ. ज्योती नंदू कापसे आणि तज्ज्ञ संचालक म्हणून दयाराम हरि इंदूलकर व स्नेहा देशमुख यांची निवड झाली होती.
कालांतराने बँकेचे घोटाळे बाहेर येऊ लागल्याने अध्यक्ष विवेक पाटील यांनी आपले चिरंजीव अभिजित विवेकानंद पाटील यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांना संचालक मंडळातून दूर केले. या संपूर्ण प्रकरणात आपला मुलगा अडकू नये यासाठीच त्यांनी ही खेळी केल्याचे त्या वेळी बोलले जात होते.
त्यानंतर 31 मार्च 2018 रोजी रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेच्या 59 प्रकरणांमध्ये गंभीर आक्षेप निदर्शनास आल्याचे नमूद केले होते. त्यामुळे या कर्ज व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणामध्ये बँकेने केलेल्या संपूर्ण कर्ज प्रकरणामध्ये मंजुरी, कर्जवाटप आणि इतर बाबींमध्ये पोटनियम व बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949नुसार 63 कर्ज प्रकरणांत 30 सप्टेंबर 2019पर्यंत 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सकृतदर्शनी या सर्व गैरव्यवहारास बँकेचे संचालक मंडळ, बँकेचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित बँक अधिकारी, सर्व कर्जदार हे जबाबदार असल्याचे दिसून येते.
या सर्व मंडळींनी केलेल्या संगनमताने आणि कर्जवाटप व गैरव्यवहारामुळे सभासद, बँकेचे ठेवीदार व खातीदार यांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. सहकार खात्याला विशेष लेखापरीक्षणादरम्यान कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाने एकाच टाईपातून उतरलेले म्हणजेच एकाच पद्धतीने लिहिलेले खुलासे आणि जबाब आणि त्यावर आपली संमती असल्याचा विवेक पाटील यांचा जोडजबाब पाहून आश्चर्य वाटते.
नमुन्यादाखल कर्नाळा बँकेच्या संचालकांनी लिहिलेले जबाब ‘राम प्रहर’च्या वाचकांसाठी देत आहोत. सर्व संचालकांनी आपल्याला आलेल्या नोटीसवर दिलेल्या खुलासापत्रात म्हटले आहे की,
महोदय,
आपलेकडील वरील संदर्भिय पत्रानुसार पुढीलप्रमाणे खुलासा करीत आहे.
मी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा संचालक आहे. आपण आपल्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या 63 कर्ज प्रकरणांमध्ये संचालक मंडळाने मंजुरी दिलेली आहे हे खरे आहे, परंतु मी बँकेचा जरी संचालक असलो तरी बँकेचा संपूर्ण कारभार हा एकहाती बँकेचे अध्यक्ष श्री. विवेकानंद शंकर पाटील हे सांभाळतात. वरील कर्ज प्रकरणे तसेच इतर कर्ज प्रकरणांबाबत कर्ज मंजुरीचा निर्णय हा सर्वस्वी बँकेचे अध्यक्ष श्री. विवेकानंद पाटील हेच घेत आलेत. त्यामुळे वरील सर्व 63 कर्ज प्रकरणांची कर्जमंजुरी करणे व कर्ज वाटप व कर्जवसुली करणे याबाबतची जबाबदारी बँकेचे अध्यक्ष श्री. विवेकानंद पाटील यांचीच आहे.
तरी सदर कर्ज रकमेबाबतची संपूर्ण जबाबदारी बँकेचे अध्यक्ष श्री. विवेकानंद पाटील यांनी स्वीकारली असल्यामुळे सदर कर्जाबाबत मला जबाबदार धरण्यात येऊ नये, ही विनंती.
कळावे,
आपला विश्वासू
सदाशिव म. वाघ (सदाशिव महादू वाघ)

महोदय,
आपलेकडील वरील संदर्भिय पत्रास पुढीलप्रमाणे खुलासा देत आहे.
आपण सदर नोटीसमध्ये नमूद केलेल्या 63 कर्जप्रकरणी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत माझे वैयक्तिक सांगणेवरूनच सदर कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. सदर कर्जप्रकरणी झालेल्या कर्जवाटपास माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. सदर प्रकरणी संपूर्ण कर्ज वसुली करण्याची जबाबदारी माझी आहे.
कळावे,
आपला विश्वासू
 (विवेकानंद शंकर पाटील)

कर्जदारांनी आपल्या कर्जाबाबत जसे खुलासे दिले, तसेच खुलासे हे कर्ज मंजूर करणार्‍या संचालक मंडळातील संचालकांनीही एकाच फॉरमॅटमध्ये (एकाच साच्यात) दिले असून, त्यावर आपला संमतीवजा खुलासाही विवेक पाटील यांनी दिला आहे. या संपूर्ण खुलासा प्रकरणात बँकेचे तत्कालीन संचालक अभिजित विवेकानंद पाटील यांचे एकही पत्र वा खुलासा संपूर्ण लेखापरीक्षणात आढळला नसल्याचे दिसून येते, तसेच बँकेचे संचालक असलेले रवींद्र श्रावण चोरघे यांच्या साई दत्ता कन्स्ट्रक्शन, ओडी खाते क्र. 282 या खात्यावरून याच बँकेने 9 कोटी 88 लाख 41 हजार 583 रुपयांचे कर्ज दिले आहे. (‘राम प्रहर’च्या शनिवार, 8 फेब्रुवारी 2020च्या अंकातील कर्जदारांच्या यादीत या संचालकांचाही उल्लेख आहे.)
भ्रष्टाचार आणि घोटाळ्याने बरबटलेल्या कर्नाळा बँकेला मी स्वत: वाचवणार, असे खातेदार, ठेवीदार यांना सांगून शेकाप नेते आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी धडधडीतपणे केलेला खोटेपणा उद्या आपल्यासमोर पुराव्यासह आणत आहोत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply