Breaking News

पेण खारेपाट तहानलेलाच!; अधिकार्‍यांची आश्वासने यंदाही हवेत विरली

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील खारेपाट भागाला 10 मेपासून आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होणार असल्याने या भागात मोठी पाणीबाणी निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात हेटवणे, शहापाडा, आंबेगाव अशी तीन तीन धरणे असूनदेखील या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पीक घेतले जाते तर खारेपाट भागात पीक सोडाच पण पिण्यासाठीदेखील पाणी मिळेनासे झाले आहे. या भागातील लोकप्रतिनिधींना येथील अधिकार्‍यांनी एप्रिल अखेर पिण्याचे पाणी नळाद्वारे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जाणार असल्याने या अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींना आश्वासनांची चपराकच लगावली असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या 8 ते 10 दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी पेण तालुक्याच्या ग्रामीण भागात पोहचणार आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस कालव्याचे पाणी बंद करू नये, असे पत्र  हेटवणे विभागाला देत असल्याची माहिती जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी एस. पी. वेंगुर्लेकर यांनी दिली. पेणच्या ग्रामीण भागाला पाणी देण्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. फक्त एका जागामालकाचा प्रश्न सोडवायचा आहे. तो 110 मीटरचा प्रश्न निकाली निघाला की येत्या 8 ते 10 दिवसात आपण पाणीपुरवठा सुरू करू शकतो. जागा मालकाबाबत तहसील कार्यालयाशी आम्ही संपर्कात आहोत, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पेण येथील उपअभियंता इ. डी. कोठेकर यांनी दिली.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply