Breaking News

हिंगणघाटच्या लेकीचा संघर्ष थांबला!

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वर्धा ः प्रतिनिधी
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी (दि. 10) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणार्‍या सदर तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी (दि. 3) ही दुर्दैवी घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक पीडितेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते, मात्र सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला.
हिंगणघाट जळीत प्रकरणातील तरुणीवर सोमवारी संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावातील ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी तिला अत्यंत दु:खद अंतकरणाने निरोप दिला. पीडितेला 7 फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्याने जंतुसंसर्ग वाढत गेला आणि सोमवारी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.
अंत्यसंस्काराआधी पीडितेच्या नातेवाइकांनी या प्रकरणातील आरोपीस कडक शिक्षा तसेच इतर बाबींचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता, मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला. पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पीडितेच्या मृत्यूनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. संतप्त नागरिकांनी या वेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली, तसेच काही जणांनी दगडफेकही केली.
नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 300 पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात होता.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा दिली जाईल. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेच्या भावास शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येईल, असे वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी लेखी लिहून दिले आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply