खोपोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ’विश्वसाहित्य’ प्रकल्पाच्या लेखन व समीक्षण कार्यात योगदान देण्यासाठी राज्य शासनाकडून खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाचे प्रा. बी. एम. नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासनाचा बृहदप्रकल्प आहे. ज्ञाननिर्मिती व ज्ञानसंवर्धन या कार्यात विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झालेले आहेत. त्याचे अद्ययावतीकरण व नवे लेखनकार्य करण्याचे कार्य विश्वसाहित्य सदस्य समितीकडून होणार आहे. प्रा. बी. एम. नन्नवरे हे खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात मराठी भाषेचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. नवनियुक्तीबद्दल प्रा. नन्नवरे यांचे केटीएसपी मंडळचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, केएमसी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
विश्वसाहित्य सदस्य ही माझ्यासाठी सुवर्णसंधी असून, या माध्यमातून आपल्या मातृभाषेची अधिक सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे.
-प्रा. बी. एम. नन्नवरे,
मराठी विभाग, के. एम. सी. महाविद्यालय, खोपोली