Breaking News

वृद्धाच्या डोक्यात बाटली फोडणारे दोघे अटकेत

पनवेल : वार्ताहर

नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या आवारात दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना हटकणार्‍या 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यावर दोघा तरुणांनी दारुची बाटली फोडून पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी दोघा हल्लेखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. 

या घटनेत जखमी झालेले नारायण गणु पाटील (वय 72 रा. नेरूळ गाव) हे नेरूळमधील गावदेवी मंदिराचे विश्वस्त आहेत. यावेळी मंदिराच्या आवारात रतिन मदन आचार्य (वय 23) व त्याचा साथीदार पियुष पाटील (वय 21) हे दोघे तरुण दारू पित बसल्याचे नारायण पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाटील यांनी दोघांना हटकले. त्यामुळे पियुषने त्यांना शिवीगाळ केली, तर रतिनने नारायण पाटील यांचे दोन्ही हात पकडून ठेवले. त्यानंतर पियुषने नारायण पाटील यांच्या डोक्यात दारुची काचेची बाटली फोडली. त्यानंतर दोघा हल्लेखोर तरुणांनी त्याठिकाणावरून पलायन केले.

नागरिकांनी जखमी नारायण पाटील यांना तत्काळ मिनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी नारायण पाटील यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रतिन आचार्य व पियुष पाटील या दोघांवर कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करून शनिवारी दोघांना अटक केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply