कर्जत : बातमीदार
तालुक्यातील धामोते येथे असलेल्या चार एकर जमिनीची बनावट मालकाच्या सहाय्याने विक्री करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील धामोते गावात कमल प्रदीप कोठारी (रा. वरळी मुंबई) यांच्या मालकीची जमिन (सर्व्हे नंबर 69 चा हिस्सा नंबर 4) आहे. या सुमारे चार एकर जमिनीची फेब्रुवारी 2022 मध्ये बोगस महिला मालकाच्या सहाय्याने विक्री करण्यात आली. जमिनीच्या मूळ मालक कमल कोठारी यांच्या अपरोक्ष खरेदीखताचे बनावट आणि बोगस दस्ताऐवज तयार करुन त्याची कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली. या प्रकारात मिलिंद मनोहर देसाई, एक अनोळखी इसम, नेरळ येथील सुरेश रतन राजमुतक आणि उत्तर प्रदेशातील शनी बाबू शेट्टी यांचा समावेश होता.कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखताच्या दस्ताऐवजाची नोंदणी करताना जमिनीचा बोगस मालक मिलिंद मनोहर देसाइ आणि बोगस अनोळखी महिला यांनी डुप्लिकेट आधार कार्ड, पॅनकार्ड सादर केले व त्या जमिनीच्या मूळ मालक कमल कोठारी या आपणच असल्याचे भासवून अनोळखी महिलेने दुय्यम निबंधकांची खात्री पटवून दस्ताऐवजाची (क्र. 505/2022 दि. 10/02/2022) नोंद केली. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भादंविक 420, 417, 419, 465, 466, 467,471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गिरीश भालचिम करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.