Breaking News

सत्ताधार्यांना भयगंड

सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पहारेकर्‍याची आपली भूमिका कठोरपणे पार पाडेल. त्याला तोंड देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी सतर्क राहावे. सरकार पडेल की न पडेल याची चिंता भाजपला नाही, पण ती सत्ताधार्‍यांच्याच मनात आहे हे दिसून येत आहे. पाच वर्षे टिकायचे असेल तर या भीतीपासून महाविकास आघाडीने एकदाचे मुक्त झालेले बरे!

महाराष्ट्राच्या मतदारांनी स्पष्टपणे दिलेला जनादेश केराच्या टोपलीत टाकून विश्वासघाताच्या जोरावर सत्तेत आलेल्या तीनचाकी महाविकास आघाडीच्या सरकारला तीन महिने झाले तरी सूर गवसलेला नाही. जनतेची कामे पूर्णत: अडकून पडली आहेत. शेतकर्‍यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सार्‍यांच्याच समस्या ‘जैसे थे’ अवस्थेत अधांतरी लटकलेल्या आहेत. पोकळ घोषणा, कोरडी आश्वासने आणि अंतर्गत कुरघोडीचे डावपेच यामध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार गुंतून पडल्याचे चित्र दिसत आहे. जनादेशाचा कुठलाही आधार नसलेले खिचडी सरकार अंतर्विरोधानेच इतके कमकुवत आणि खिळखिळे आहे की ते पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तथाकथित ‘ऑपरेशन लोटस’ वगैरे उठाठेवी करण्याची गरजच नाही. भाजपच्या नेत्यांनी सरकार पाडण्यामध्ये स्वारस्य नसल्याचे अनेकदा स्पष्टपणे सांगितले आहे, परंतु भित्यापाठी ब्रह्मराक्षस, या म्हणीनुसार सत्ताधार्‍यांची अवस्था झालेली दिसते. ‘सरकार पाडायचे असेल तर ते उद्या कशाला, आजच पाडा,’ असे आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी मध्यंतरी एका भाषणातून दिले होते. त्याचा यथायोग्य समाचार घेणे आवश्यक ठरते. अर्थात तुमचे सरकार पाडण्यासाठी काहीही करावयाची गरज नाही. आपल्या वजनानेच ते पडेल, असे सडेतोड उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेच आहे. नवी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात ठाकरे यांच्या फुसक्या आव्हानातील उरलीसुरली हवादेखील काढून टाकली आणि भाजपच्या पुढील वाटचालीबद्दल स्पष्ट संकेत दिले. तोळामासा प्रकृतीचे हे सरकार कधीही पडेल हे खरे असले तरी त्याची वाट न पाहता आपण सक्षम विरोधी पक्षाचे काम जोरात पुढे न्यायला हवे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असा विचार फडणवीस यांनी मांडला. भाजपच्या उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भाषणामुळे वेगळाच जोश भरला. भाजपचा डीएनए हा विरोधी पक्षाचाच आहे ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्षात राहून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे, त्यांची दु:खे समजून घेऊन ती निवारण्याचे काम भाजपने अनेक वर्षे केले. ज्या वेळी सत्ता वाट्याला आली तेव्हा राज्यदेखील अत्यंत प्रगल्भपणे हाताळणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते. म्हणूनच गेल्या निवडणुकीत जनादेश भाजपच्या बाजूनेच मिळाला होता. हा जनादेश धुडकावून विश्वासघाताने सत्ता हस्तगत करणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात हीच बोच असावी. म्हणून भाजप सदोदित सरकार पाडण्यासाठी काही कारस्थाने करीत आहे, असा भयगंड सत्ताधार्‍यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याचेच प्रत्यंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निरर्थक आव्हानाच्या भाषेतून येते. याच भयगंडातून सामान्य जनतेची कामे होईनाशी झाली आहेत. शेतकरी असो, नोकरदार असो, मजूर असो वा विद्यार्थी, महाराष्ट्रातील कुठल्याही वर्गाच्या समस्यांची तड लागेनाशी झाली आहे. तेव्हा या भयगंडातून सत्ताधार्‍यांनी आता तरी बाहेर पडावे आणि जनतेची कामे मार्गी लावावीत, एवढीच अपेक्षा आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply