अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग शहरात वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. वीजवाहिन्या भूमिगत झाल्यानंतर अलिबाग शहरात विजेच्या तारा तुटून, खांब कोसळून अपघात होण्याचा धोका टळणार आहे.
चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वरून जाणार्या विजेच्या तारा तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवितहानी होते. शिवाय वीजपुरवठा खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी भूमिगत विद्युत प्रणाली तयार करून सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत समुद्रकिनार्याजवळील शहरांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याची योजना जागतिक बँकेच्या
अर्थसाह्यातून राबविली जात आहे. या प्रकल्पासाठी अलिबाग शहराची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत अलिबाग शहरात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून बँक, केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणार्या या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात एकूण 27 किमी लांबीची उच्चदाब वाहिनी व 45 किमी लांबीची लघुदाब वाहिनी भूमिगत टाकली जाणार आहे. 7.9 चौ.किमी परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात एकूण 118 रोहित्र, 78 आरएमयू यांचाही समावेश आहे. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.