Breaking News

नागोठण्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू; एकूण 554 विद्यार्थी

नागोठणे : प्रतिनिधी

कोएसोच्या नागोठणे येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील केंद्र क्रमांक 2721 मध्ये बारावीच्या परिक्षेस मंगळवार (दि. 18) पासून प्रारंभ झाला. आज पहिला पेपर असल्याने या केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा उपस्थित राहिल्याने केंद्राचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या केंद्रांत कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय, अंबानी फाउंडेशनचे उच्च माध्यमिक विद्यालय, भाएसोचे एस. डी. परमार इंग्लिश मिडियम स्कुल आणि नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे उर्दू कनिष्ठ महाविद्यालय आदी उच्च माध्यमिक शाळांमधील शास्त्र शाखेचे 267, वाणिज्य शाखेचे 154 आणि कला शाखेतील 133 असे एकूण 554 विद्यार्थी परिक्षा देत असल्याची माहिती केंद्रसंचालक विजय देवकते आणि  जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. एल. जांभळे यांनी दिली. नागोठणे परिसरातील गावांमधील विद्यार्थी एसटी बसेस, खासगी वाहने तसेच रिक्षांद्वारे एक तास अगोदरच नागोठण्यात दाखल झाल्याने वेळेत म्हणजेच अकरा वाजता त्याला परिक्षेस बसण्याची संधी मिळाली होती. बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात परिक्षेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने कोठेही अनुचित प्रकार न घडता परीक्षा शांततेत पार पडली.

कर्जत तालुक्यात कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके

कर्जत : बातमीदार

उच्च माध्यमिक मंडळाची म्हणजे बारावी ची परीक्षा मंगळवार (दि. 18) पासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यात तीन केंद्र ठेवण्यात आले असून, त्या केंद्रावर 2262 विद्यार्थी  परीक्षा देत आहेत. दरम्यान, परीक्षा काळात केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे कॉपी विरहित परीक्षा पार पाडण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.  तालुक्यातील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत असलेल्या केंद्रावर कला, वाणिज्य,विज्ञान आणि बँकिंग अशा विभागात 940 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. तर नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रामध्ये 815 विद्यार्थी आणि कशेळे येथील भाऊसाहेब राऊत माध्यमिक विद्यालयातील केंद्रामध्ये 507 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.  परीक्षा सुरू असताना कोणालाही मोबाईल फोन परीक्षा केंद्रांवर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेपर सुरू असताना कोणीही कॉपी करू नये, यासाठी उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने भरारी पथके नेमली असून, विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्यास तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार या भरारी पथकाला देण्यात आले आहेत.

बारावीच्या कर्जत, नेरळ आणि कशेळे येथील तिन्ही परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तेथील प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ठेवण्याच्या स्ट्राँग रूमला खडा पहारा देण्यात आला असून, या स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची 24 तास नजर राहणार आहे.

-अनिल घेरडीकर, पोलीस उपअधीक्षक, कर्जत

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply