Breaking News

अपंगत्वाचा दाखला

महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो. काम आटोपला उशीर झाला. रात्री मी पनवेलला येण्यासाठी रावते साहेबांच्या शिवशाहीने  निघालो. आमची गाडी स्वारगेटहून म्हात्रे पूलावरून पुढे आल्यावर चांदणी चौकाकडे जाण्याचा रस्ता, चालक पुण्यात नवीन असल्याने  दोन-तीन वेळा चुकला त्यामुळे वाहकाला अनेकवेळा खाली उतरून रस्ता विचारावा लागत होता. गाडीत पुणेकर प्रवासी होते पण ते रस्ता दाखवण्यापेक्षा गंमत बघत होते. रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे वळवण्यासाठी वाहकाला रस्त्यावर  वाहतूक थांबवण्याची कसरत करावी लागत होती. आमच्या सारख्या पुणेकर नसलेल्यांना कोथरूडच्या गल्लीबोळातील गणपती आणि मारूतीचे दर्शन मात्र यामुळे घडले. तासाभराने  एकदाची गाडी चांदणी चौकात आल्यावर गाडीतील सर्वांना हुश्श झाले. तेथील आरक्षणाचे प्रवाशी घेऊन गाडी पुढे निघाली. गाडी सुटल्यावर एक माणूस गाडी मागे धावत धावत गाडी थांबवा म्हणून ओरडत होता. आमच्या वाहकाने गाडी थांबवून त्याला गाडीत घेतले. तो माझ्या बाजूलाच येऊन बसला. वाहक तिकीट काढायला आल्यावर त्याने अपंगाचे ओळखपत्र दाखवून सवलतीचे तिकीट घेतले.

थोड्या वेळानंतर मी त्याच्याजवळ गप्पा मारायला सुरुवात केली. त्याला विचारले तुम्ही जन्मापासून अपंग आहात काय? तो म्हणाला नाही हो मोटरसायकल वरुन पडलो पायाला थोडेसे फॅक्चर झाले. मग काय आमच्या ओळखीच्या एकाने सांगितले बरे झाले.  तुला आता अपंगाचा दाखला मिळवून देतो म्हणजे सवलती मिळतील. थोडेसे पैसे दिले आता सगळ्या सवलती मिळतात. अहो, आमच्या मराठवाड्यात हे तर काहीच नाही माझ्या एका मित्राचे डोळे आले होते.  त्यांनंतर कमी दिसतय सांगून आंधळ्याचा दाखला घेतलाय. जेव्हा गरज असेल तेव्हा तो नाटक करतो. अहो, पैसे दिले की सगळे मिळते. तुम्ही कोठे राहता तुम्ही रोज प्रवास करीत असाल तर तुम्हाला ही अपंगाचा दाखला मिळवून देतो. अहो, एकदा दाखला मिळाला की कोण बघतोय. आता बघा मला एसटीत तिकीटासाठी 25 टक्केच द्यावे लागतात आणि पुन्हा राखीव जागा. मी एका कुरीयर कंपनीत काम करतो रोज त्यांचे टपाल घेऊन जात असतो. कंपनीचा पगार मिळतो शिवाय तिकिटाचे पैसे देतात त्यातले वाचतात.

शासनाने दिव्यांगांना सवलती दिल्याने त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सिव्हिल सर्जनला पैसे देऊन खोटे अपंगाचे दाखले  घेण्यात येत आहेत. या व्यक्तींनाच सगळ्या सवलती मिळत असल्याचे दिसून येत आहे. खरे अपंग मात्र या सवलतीपासून वंचित आहेत. माझ्या माहितीत आपल्या रायगडमध्ये ही असे अनेक जण आहेत की साध्या अपघातानंतर अपंगाचे दाखले घेऊन सगळ्या सवलती घेत आहेत. पण प्रत्यक्षात अपंग असलेल्या कित्येकांना असे दाखले मिळतात हेच माहीत नाहीत. त्यांच्या पर्यंत शासन पोहचत नाहीत.पनवेल महापालिका आयुक्तांनी ही मध्यंतरी अपंगांची नोंदणी होत नसल्याची खंत व्यक्त केली होती.  

महात्मा गांधी तंटा मुक्त गाव योजनेच्या वेळी तळा तालुक्यातील एका अपंग मुलीचे शारीरिक शोषण झाल्याची तक्रार आल्यावर पोलिसांनी मुलाच्या घरच्यांना त्यांच्या भाषेत समजावून तिचे लग्न लावून दिले. तिला सवलती मिळतील असे सांगितले होते. त्यावेळी त्या मुलीला साधा अपंगाचा दाखला ही मिळालेला नव्हता. लग्नानंतर एक वर्षांनी तिला सवलती मिळवून देण्यासाठी पत्रकार असून मला किती खटपट करावी लागली याचा अनुभव मी घेतला आहे. पण दलाल मात्र पैसे घेऊन सिव्हिल सर्जनचा दाखला लगेच आणून देतात. मध्यंतरी शासनाने नवीन संगणकीय ओळखपत्र देण्याचे जाहीर केले होते. यामध्ये अपंगत्वाच्या टक्केवारीप्रमाणे  या ओळखपत्रांचा रंग वेगवेगळा असणार होता त्याच्यावर सिव्हिल सर्जन व अस्थि रोग तज्ञाची स्वाक्षरी असणार होती. यामुळे खोट्या ओळखपत्रांना आळा बसला असता पण राजकीय दडपणामुळे ती ओळखपत्रे अद्याप देण्यात आली नसल्याचे समजते. अपंग संघटना ही यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत हेच खरे दुर्दैव आहे.

-नितीन देशमुख

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply