Breaking News

म्हसळेकरांनी शिस्तीचे पालन करावे

जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे आवाहन

म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी मोर्चांमुळे संवेदनशीलता वाढत असतानाच म्हसळा शहरात एका शाळकरी हिंदू मुलीची मुस्लिम तरुणाने छेडछाड काढल्यावरून अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी म्हसळा शहराला भेट देत नागरिकांनी शिस्तीचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
म्हसळा पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता सभेला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार व अन्य अधिकारी, शांतता समितीचे हिंदू, मुस्लीम, जैन समाज अध्यक्ष, व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
म्हसळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील, शहर अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेठ करडे, मुस्लिम समाजाचे जिल्हा अध्यक्ष अली कौचाली, माजी सभापती नाझीम हसवारे, नाझीम चोगले, फजल हळदे, योगेश करडे, रेखा धारिया व अन्य मंडळींनी मते मांडताना आम्हाला दोन्ही समाजात, शहरात व तालुक्यात शांतता हवी आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य व कायद्याचे पालन करणार अशी हमी त्यांनी दिली. त्याचबरोबर तालुका प्रभारी अधिकारी व उपविभागीय अधिकार्‍यांची पोलीस प्रशासनावर पकड असणे आवश्यक आहे. (पान 2 वर..)
भविष्यात तक्रार करण्याची व देण्याची वाट न पहाता कायदा व सुव्यवस्थेचे नागरिकांकडून पालन होण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. प्रसंगी पोलिसांनी फिर्यादी बनण्याची गरज आहे, तसेच म्हसळा पोलीस ठाण्याला आवश्यक कर्मचारी मिळावे, त्यांना सोयीसुविधा द्याव्या, असेही सूचविण्यात आले.
म्हसळेकरांनी आज आपले मन व मत खुले करताना शांतता, सोदार्ह व शिस्तपालनाची दिलेली हमी ही माझ्या दृष्टीने कौतुकाची आहे. मी आजच आपल्या पोलीस ठाण्याला शिस्तप्रिय प्रभारी अधिकारी व आवश्यकतेनुसार स्टाफ नक्कीच देईन. आपणाकडून पोलीस दलासाठी युवकांनी भरती होण्याबाबत चळवळ उभारणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक पारसकर यांनी युवकांना पोलीस खात्यात भरती होण्याचे आवाहन केले.
नुकत्याच राज्यातील हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल येथे महिलांबाबत घडलेल्या घटनांमुळे राज्यातील व जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सर्तक झाले आहे. युवकांनी एकतर्फी प्रेम, सोशल मीडियाचा गैरवापर करू नये, तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे या वेळी पारसकर यांनी स्पष्ट केले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply