खोपोली : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर युतीचा मात्र विजयोत्सव असे चित्र शुक्रवारीही दिसले.
मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या खोपोली नगरपालिका क्षेत्रातून आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना मोठी आघाडी मिळेल, ही अपेक्षा खोपोलीतील राष्ट्रवादी व काँग्रेस, शेकाप या आघाडीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना होती. मात्र प्रत्यक्षात मात्र उलटे झाले. अनेक दिगग्ज नेते, नगराध्यक्षापासून 15 नगरसेवकांची मोठी फौज असतांनाही खोपोलीतून पार्थ पवार यांच्यापेक्षा बारणे यांना दोन हजाराहुन अधिक मतांची आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाल्यावर खोपोलीत आघाडीच्या गोटात मोठा सन्नाटा पसरला आहे.
या बाबत आघाडीचा कोणीही नेता किंवा नगरसेवक बोलण्याच्या स्थितीत नाही. माजी नगराध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस दत्ताजी मसुरकर यांना विचारले असता, आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन प्रचार यंत्रणेपासून मतदान प्रक्रिया अतिशय उत्तम राबविली. तरीही अपेक्षित यश मिळाले नाही, हे मान्य केले. कोणत्या चुका झाल्यात व कुठे उणिवा राहिल्या या संबधी पक्ष पातळीवर सविस्तर चर्चा होईलच.मात्र आत्मपरिक्षण करण्याची वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.