Breaking News

पनवेल, उरण तालुक्यांत सर्वत्र कडकडीत बंद

जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

शासनाने जाहीर केलेल्या रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सर्वत्र निरव शांतता व शुकशुकाट होता. बंद असतानाही अतिशहाणपणा करून रस्त्यावर उतरणार्‍या अविचारी नागरिकांना चांगलाच पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, कोपरा, खारघर यांच्यासह कळंबोली औद्योगिक वसाहत, तळोजा औद्योगिक वसाहत व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवार असल्याने अनेकांनी घरात राहूनच सुटीचा आनंद कुटूंबियांसह लुटला. काही अतिउत्साही लोक रस्त्यावर कारण नसताना फिरताना दिसल्यास त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादसुद्धा मिळाला. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार व घटना घडली नाही. त्याचप्रमाणे पनवेलजवळून जाणारा मुंबई-पुणे महामार्गावरसुद्धा क्वचितच एखादी गाडी ये-जा करीत होती. त्याचप्रमाणे पनवेल रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक येथेही अल्प प्रवासी होते. मुंबई उपनगरातून पनवेेल गाठायला दिड ते दोन तास लागतात, परंतु आज अवघ्या 55 मिनिटांत लोकांनी पनवेल शहर गाठले. महामार्गावरसुद्धा तुरळक गाड्यांची ये-जा होती. असे असले तरी पनवेल महानगरपालिकेचे सफाई कामगार आपल्या कर्तव्यावर सकाळपासूनच उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोलीस बांधवही मध्यरात्रीपासून सतर्क होते.

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

कोरोना या विषाणूचा प्रसार होयू नये या करिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) देशभरात जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केले होते, त्या अनुषंगाने उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यूला सर्व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. न्हावा-शेवा सहाय्यक पोलीसायुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण चारफाटा, राजपाल नाका, वैष्णवी हॉटेल कॉर्नर, देऊळवाडी, गणपती चौक, चिरनेर परिसर, जासई परिसर आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्यावरून येणार्‍या नागरिकांची चौकशी करण्यात आली. या पोलीस बंदोबस्तात 10 अधिकारी, 35 कर्मचारी त्यात एक व 6 महिला कर्मचारी आदी ठेवण्यात आले आहे. या जनता कर्फ्यूसाठी उरणच्या जनतेने उत्तम सहकार्य केले आहे. त्यांचे मी आभार मानतो, असे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी माहिती दिली. सकाळपासूनच उरण तालुक्यातील वाहतूक तसेच नागरिकांचा रस्त्यावरील वावर पूर्णतः बंद झाला. तालुक्यातील उरण-पनवेल मार्ग, गव्हाणफाटा-चिरनेर मार्ग, चिरनेर- खारपाडा मार्ग, जेएनपीटी-पनवेल, बेलापूर, कळंबोली महामार्ग, कोप्रोली-उरण मार्ग आदीसह सर्वच रस्त्यांवर पोलीस वाहन व रुग्णवाहिका व्यतिरिक्त एकही वाहन धावताना दिसत नव्हते. गावोगाच्या रस्त्यांवर एकही व्यक्ती वावरताना दिसत नव्हती. बहुतेक जनतेने आपापल्या घराची दारे खिडक्या बंद करून स्वतःला घरात कोंडून घेतले होते. जनतेच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाला पोलीस यंत्रणेनेही सॅल्युट केला आहे.

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना विषाणू विरोधात लढा देण्यासाठी रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच रसायनी करांनी जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. परीसराजवळील रसायनी-दांड रस्ता, जुना मुंबई-पुणे महामार्ग, द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. परिसरातील मोहोपाडा बाजारपेठ, दळणवळण साधने पुर्णपणे बंद ठेवून कडकडीत जनता कर्फ्यू बंद पाळण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कफ्यु बंदचे आवाहन केले होते. या बंदला रसायनी पाताळगंगा परीसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर पोलीस व्हॅन परीसरात वेळोवेळी फिरत असल्याचे चित्र होते. या वेळी बर्‍याचशा कंपन्यानीही बंद पाळल्याचे दिसून आले. परिसराची मुख्य बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा शहरात सकाळ पासूनच शुकशुकाट जाणवत होता. रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच घरीच थांबून शंभर टक्के जनता कर्फ्यू यशस्वी केला. तर नेहमीच वाहनांची रहदारी असलेल्या रसायनी दांड रस्ताही शांत होता. संपूर्ण जगावर कोरोना व्हायरस संकट ओढवलेले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करणे हा महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी सर्वांनी सावध राहून दक्षता बाळगल्याने रसायनी परीसरात शुकशुकाट होता. रसायनीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाकेला साद देत शंभर टक्के बंद पालून जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply