Monday , February 6 2023

काशीद व मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

मुरुड : प्रतिनिधी

सलग आठ दिवस नाताळाची सुट्टी शाळेला पडल्याने  पर्यटकांनी मुरुड व काशीद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बुधवारी (दि. 25) सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, आगरदांडा जेट्टी तसेच दिघी येथून पर्यटकांनी गर्दी केली होती. किल्ल्यावर जाण्याकरिता बोटीत बसण्यासाठी पर्यटकांना किमान एक ते दिड तास वाट पहावी लागत होती.

मुरुड तालुक्यातील काशीद बीच, दत्तमंदिर, गांरबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसर आल्हाददायक, शांत व रमणीय आहे. मुंबईपासून केवळ 160 किलोमीटर अंतरावर असल्याने तेथे पर्यटकांची पंसती वाढती आहे. मुरुड समुद्रकिनारी सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे व इतर शहरातून असंख्य पर्यटक कुटुंबासह दाखल झाले आहेत.

मुरुड शहरातील सर्व लॉजेस हाऊसफुल झाले आहेत. तर घरगुती हॉटेलमध्येही भोजनासाठी मोठी गर्दी होत आहे. समुद्र किनारी वाळूत चालणार्‍या गाड्या, घोडा गाड्या, बनाना बोट आदी सर्वच ठिकाणी गर्दीचगर्दी दिसून आली. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्याने स्थानिकांच्या व्यवसायात वृद्धी झाल्याचे दिसून येत आहे. मुरुड बाजारपेठ, खोरा बंदर, राजपुरी गाव, मुरुड शहरातील मासळी मार्केट रस्ता आदी ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये, याकरिता मुरुड पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 काशीद येथेसुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. काशीद येथील सर्व हॉटेल व लॉजिंग हाऊसफुल झाल्या आहेत. या सलग सुट्ट्यांची बुकिंग पर्यटकांनी महिनाभर अगोदरच करून ठेवल्याने नवीन येणार्‍या पर्यटकांची येथे राहण्याची व्यवस्था झाली नाही. काशीद समुद्र किनार्‍याजवळील रस्त्याच्या  दोन्ही बाजूस वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. काशीद व मुरुड किनारी पर्यटकांनी समुद्र स्नान करून मौजमजा लुटली.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply