नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणार्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचे दोन खेळाडू करणार आहेत. मेरठचा प्रियम गर्ग या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला आहे. राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे, पण त्यांनी मुलाला स्वप्न पाहण्यापासून आणि ते सत्यात उतरण्यापासून रोखले नाही.
प्रियमने स्वत:च्या मेहनतीने हे स्थान पटकाविले आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या स्पर्धेसाठी संघाचेे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याने आपल्या आईला समर्पित केली आहे. ’माझ्या आईचे हे स्वप्न होते. तिला मला क्रिकेटमध्ये मोठे सामने खेळताना पहायचे होते,’ असे प्रियमने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. प्रियमच्या आईचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
माझ्याकडे फार साधने नव्हती. प्रियमचा खेळ पाहून मी त्याला शक्य त्या सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेतला. आधी मी टॅक्सी चालवायचो, पण काही वर्षांपूर्वी प्रियमची रणजीत निवड झाल्यानंतर परिस्थिती खूप सुधारली.
-नरेश गर्ग, प्रियमचे वडील