
मोहोपाडा : प्रतिनिधी
प्रत्येकाला कोरोना रोगाची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. परिसरात जनजागृती करुन योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. कोरोना हे नाव आता प्रत्येकांच्या मुखावरती आहे. यामुळे तो आजार पसरु नये यासाठी प्रत्येकांनी खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले. अनावश्यक गर्दी करु नये किंवा काही महत्वाचे काम असल्यास घराबाहेर पडा, आपल्याला या रोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच परदेशी नागरिक आढलल्यास ग्रामपंचायतीला कळवावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी केले आहे. कोणतेही आजार अंगावर काढू नये असा नागरिकांना सल्ला देत लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपण आपली काळजी घ्या, असे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी गावातून जनजागृती मोहीम काढण्यात आली. या वेळी हे जंतू हाताच्या माध्यमातून पसार होत असल्यामुळे सॅनिटायझरच्या लिक्विड ही या वेळी देण्यात आले. त्याच समवेत मोफत माक्स देण्यात आले. या वेळी ग्रूप ग्रामपंचायत सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे, मारुती माने व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ आदींनी या जनजागृती मोहीमेत सहभागी होवून कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करीत आहेत.