पनवेल : बातमीदार
नवी मुंबई शहरात मंगळवारी (दि. 31) कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 11वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाशी येथे मंगळवारी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण वाशीतील मशिदीमध्ये फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या 52 जणांचे सध्या घरी विलगीकरण करण्यात आले आहे. दुसरा रुग्ण नेरूळ येथे आढळून आला. हा रुग्ण मुंबईमध्ये एका करोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. तिसरा रुग्णही नेरूळ सेक्टर 28मध्ये आढळून आला आहे. नातेवाइकांच्या वैद्यकीय तपासणीनंतर नवी मुंबईत नव्याने आढळून आलेल्या दोन्ही रुग्णांना यापूर्वीच विलग करण्यात आले होते. त्यांच्या घरातील सदस्यांची आणि ते ज्या नातेवाइकांना भेटले त्यांची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांचे आता घरातच विलगीकरण करण्यात आले आहे, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.