पनवेल : रामप्रहर वृत्त
सीरवी समाज संस्था आणि करंजाडे नागरिक मंच यांच्यातर्फे दीपावलीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त सोमवारी (दि. 1) गोमाता वासरु पूजन आणि संगीत संध्या हा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी करंजाडे सेक्टर 3 येथील दुर्गा माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यासोबतच फक्त महिलांसाठी असणारे नवी मुंबईतील पहिले स्वरदुर्गा ढोल ताशा पथकाचा उद्घाटन सोहळादेखील झाला. कार्यक्रमाची सुरुवात दुर्गामाता मंदिरातल्या आरतीने झाली. आरती झाल्यावर सगळ्या महिलांनी गोमाता वासराची पूजन करून गुळाचा नैवेद्य भरवला. झी युवा संगीत सम्राट आणि स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार रियालिटी शो मधील प्रसिद्ध गायिका अस्मिता काळे यांच्या मधुर आवाजाने संगीत संध्या गाण्याचा कार्यक्रम झाला. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, रायगड विभाग संयोजिका असणार्या शितल निकम या कार्यक्रमास उपस्थित होत्या. स्वरदुर्गा ढोल ताशा पथक याचे उद्घाटनानंतर दोन मुली व दोन मुलांनी ढोल ताशा वाजवून कलेचे सादरीकरण केले. दर रविवारी याच ठिकाणी ढोलताशा प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9637398458 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.