पनवेल : वार्ताहर – प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून घरात राहणे गरजेचे असतानाही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक तसेच मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्सप्रेस महामार्गावर वाहने चालवित आहेत. तरी पुढील कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर न उतरता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत
यांनी केले आहे.
बाजारहाट करायचा असल्यास घरातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे व घराजवळ असलेल्या दुकानातून खरेदी करावी यासाठी पायी जावे. तसेच आखून दिलेल्या चौकडीत उभे राहून खरेदी करावी. वेळोवेळी हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा व कोणत्याही परिस्थितीत एकत्र वावर होणार नाही याकडे लक्ष द्यावे. शासनातर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित करण्यात येत आहे. तरी लोकांनी साठा करून ठेऊ नये. औषोधपचार करावयाचे असल्यास संबंधित कागदपत्रे जवळ बाळगावीत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच आपली वाहने रस्त्यावर काढावित. काही जण लपून छपून वाहने घेऊन जात असतात, त्यांच्या विरोधात यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. शेडूंग टोलनाका परिसरात अशाचप्रकारे अवैधरित्या ट्रक, टेम्पोतून माणसांची वाहतूक करणार्यांविरूद्ध कडक कारवाई केली आहे व वाहने जप्त केली आहे.