नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या सेवेमध्ये निरंतर अग्रेसर राहणार्या संत निरंकारी मिशनकडून लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतकेतांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एकंदर 3000 परिवारांना करण्यात आला.
भारतात हे संकट आल्याबरोबर अगदी सुरुवातीलाच म्हणजेच 13 मार्चपासून संत निरंकारी मिशनने देशभरातील आपले सर्व सत्संग कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहेत जे सामाजिक विलगीकरणासाठी गरजेचे आहे.
गरज पडल्यास मुंबईतील संत निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन (विलगता) कक्ष बनविण्यासाठी उपलब्ध केले जातील असे मंडळाच्या वतीने प्रशासनाला कळविण्यात आले आहे. याची सुरवात म्हणून मुंबईतील चेंबूर स्थित मुख्य भवनमधील काही खोल्या मंडळाने आधीपासूनच राखून ठेवल्या आहेत.
प्रशासनाकडून केल्या जाणार्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विलेपार्ले स्थित संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य जारी ठेवले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक इच्छुक रक्तदात्यांना रक्तपेढीपर्यंत जाणे शक्य होत नव्हते. अशा वेळी मंडळाने स्वत:ची वाहने पाठवून रक्तदात्यांना रक्तपेढीमध्ये आणून रक्तदानाचे कार्य चालू ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत या रक्तपेढीकडून इस्पितळांना रक्त पुरवठा केला जाईल.