पेण ः प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रसार होत आहे, परंतु पेणकरांना यांचे गांभीर्य दिसत नसून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करून संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. परिणामी आता मलाच रस्त्यावर उतरावे लागल्याची प्रतिक्रिया पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांनी दिली.
कोरोनासारख्या जीवघेण्या आजराशी मुकाबला करताना शासन व प्रशासन प्रयत्न करीत असून या लढ्यात जनतेचाही सहभाग गरजेचा आहे. अनेक ठिकाणी नागरिक मात्र कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे मला स्वतःला रस्त्यावर उतरावे लागले हे दुर्दैव आहे, म्हणून कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असे सांगून एक प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणार्यांना डीवायएसपी नितीन जाधव यांनी जणू इशाराच दिला आहे. पेण शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून रेल्वे स्टेशन, नगरपालिका चौक, रायगड बाजार, चावडी नाका अशा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांकडून दंड वसूल व गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जे लोक परदेशातून आले असतील त्यांनी स्वतःहून आपली माहिती पोलीस प्रशासनास द्यावी. लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी सामाजिक संघटनांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.