खोपोली ः बातमीदार
खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात रायगड जिल्हा पोलिस आयोजित एसपीपी (स्टुडंट पोलीस कॅडेट) या केंद्र शासनाच्या बहुउद्देशीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानात माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीमधील 15 मुले व 15 मुली अशा 30 कॅडेट्सची निवड करण्यात आली. एसपीसीमध्ये विविध बाबींचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार असून स्वरक्षण आणि समाजात गैरप्रकार रोखण्यासाठी पारंगत केले जाणार असून या सर्वाचा दैनंदिन अभ्यासावर परिणाम होणार नसल्याचे या कार्यक्रमांत स्पष्ट करण्यात आले. खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी रणजित पाटील, रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अलिबाग सुरेश वराडे, खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट अभियानासंदर्भात माहिती दिली. तसेच या उपक्रमासाठी जिल्ह्यातून पाच शाळांची निवड झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाच शाळांमधील मुलांना या स्टुडंट पोलीस कॅडेटचे प्रशिक्षण दिले जाणार असून दरवर्षी नवीन बॅच सामावली जाणार आहे. विध्यार्थी दशेतच शिस्त आणि अनुशासनाचे संस्कार होऊन भविष्यात सक्षम नागरिकांची फळी निर्माण होणार असल्याचे सुतोवात यावेळी केले गेले. शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील यांनी या अभियानात आपल्या विद्यालयाची निवड केल्याबद्दल आभार मानले. अपघाग्रस्तांना मदत करणारे गुरुनाथ साठेलकर, वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई योगेश खंडागळे, अमोल म्हात्रे, शिक्षक ज्ञानदेव बिचकर, यादव गोंडा, दिलीप म्हसे, संजीवनी बडेकर, शुभांगी पाटील इत्यादी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन सताने यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव बिचकर केले.