अलिबाग : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील रेशन दुकानावर 1 एप्रिलपासून तीन महिन्यांचे एकत्रित धान्य मिळेल असे आधी सांगण्यात आले, मात्र बारकोड नसलेल्या आणि ऑनलाइन नोंदणी न केलेल्या रेशन कार्डधारकांना धान्य दिले जात नाहीए. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाने अंत्योदय आणि केशरी रेशन कार्डधारकांना कार्डावर बारकोड देण्याची सुविधा केली होती तसेच ऑनलाइन नोंदणीही करण्यात आलेली आहे. त्यासाठी अनेकांनी रेशन दुकानावर जाऊन अर्ज भरून दिले होते. त्यांच्या रेशनकार्डला बारकोड देण्यात आलेले आहेत. काहींची ऑनलाइन नोंदही शासन दरबारी झाली आहे, मात्र अजूनही अनेक अंत्योदय आणि केशरी रेशन कार्डधारकांनी अर्ज भरले नसल्याने त्यांना बारकोड मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची ऑनलाइन नोंदणीही झालेली नाही. कार्डावर बारकोड नसल्याने ते रेशन धान्यापासून वंचित राहत आहेत. परराज्यांतील मजूर, कामगार यांना शासन जेवणाची व निवासाची व्यवस्था करीत आहे. दुसरीकडे रेशन कार्ड असून बारकोड आणि ऑनलाइन नोंदणी केली नसल्याने जिल्ह्यातील व्यक्ती मात्र धान्यपासून वंचित राहत आहेत. यावर शासनाने वेळीच तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.