Breaking News

आदिवासी बांधवांना मदत

उरण : लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर जगणार्‍या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न अ‍ॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांनी करून त्यांना रेशन, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे गाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा स्वराज्य रिक्षा संघटना अध्यक्ष अ‍ॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांच्या वतीने जांभुळपाडा आदिवासीवाडी, कंठवली आदिवासीवाडी, विंधणे आदिवासीवाडी येथील आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना मदतीचा हात म्हणून तांदूळ, डाळ, मास्क, सॅनिटायझर आणि बिस्कीट वाटप केले.

कौटुंबिक वादाच्या तक्रारींत वाढ

पनवेल : संचारबंदीमुळे नोकरी तसेच व्यवसाय करणारे कुटुंबिय आता घरीच बसले आहेत. पहिल्या आठ दिवसांत घरातील वातावरण खेळीमेळीचे असताना सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहिल्याने आता कौटुंबिक वादाला सुरुवात झाली असून काही कुटुंबियांनी तर पोलीस ठाण्याकडेसुद्धा तक्रारीसाठी धाव घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून अनेक कुटुंबियांची कुटुंबे घरातच वास्तव्यास आहेत. पहिले काही दिवस मौजमजेत गेले. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे आता कुटुंबात चिडचिड वाढीस लागली असून त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. हीच अवस्था अजून काहीकाळ राहिल्यास मोठ्या प्रमाणात कौटुंबिक वाद उफाळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

सिनेअभिनेते, क्रिकेटर होम क्वारंटाइन

पनवेल : सध्या संपूर्ण जगात कोरोना या रोगाने थैमान घातल असून संपूण देशात व महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला सक्रीय प्रतिसाद देत अनेक सिनेअभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटर्स, उद्योजक पनवेल परिसरातील त्यांच्या फार्महाऊसमध्ये गेल्या 15 दिवसांपासून स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. पनवेल परिसरातील वाजेपाडा येथे असलेल्या सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये सिनेअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सोहेल खानचा मुलगा व त्यांचे कुटुंबिय वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे अभिनेते अतुल अग्निहोत्री, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंसरकर, क्रिकेटपटू धिरज जाधव हेसुद्धा पनवेल परिसरातील फार्महाऊसमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

ई-लर्निंगद्वारे ऑनलाइन क्लासेस

कळंबोली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण भारतात 14 एप्रिल पर्यंत ताळेबंदी करण्यात आली आहे. या कालावधीत कळंबोली येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे केएलई विधी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांकरिता ई-लर्निंग माध्यमातून ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. प्राचार्य दिनकर गिते यांनी ई-लर्निंग माध्यमांतून विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून या ताळेबंदी कालावधीत शिक्षक आणि विद्यार्थी यांमधील संपर्क अबाधित राहील, विद्यार्थ्यांना यांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. ह्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. सर्व विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांकरिता ह्या ताळेबंदी कालावधीत एक सुवर्णसंधी ठरले आहे. केएलई विधी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग नियमितपणे विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन क्लासेस घेत आहेत. यासाठी केएलई विधी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनकर गिते यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply