तळोजा पोलिसांची नावडे फाटा येथील हॉटेलवर कारवाई
पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री करण्यास बंदी असताना, छुप्या पद्धतीने मद्यविक्री करून नियमभंग करणार्या तळोजा नावडे फाटा येथील जय मातादी रेस्टॉरंट अॅण्ड बारवर तळोजा पोलिसांनी छापा मारून हजारो रुपये किंमतीचा मद्याचा साठा जप्त केला. तसेच बेकायदा मद्यविक्री करणार्या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात येत्या 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून बार, पब्स, वाइन दुकाने बंद करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरदेखील तळोजा नावडे फाटा येथे असलेल्या जय मातादी रेस्टारंट अॅण्ड बारमधील कामगार बेकायदा जास्त दरात अवैध दारूची विक्री असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली. त्यानुसार तळोजा पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री जय मातादी बारजवळ जाऊन पाहणी केली असता, बारच्या शेजारील गल्लीत दोन व्यक्ती पैसे देऊन दारूच्या बाटल्या घेताना आढळून आले. या वेळी पोलिसांना पाहून राजू खडल वेटर पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी दारूविक्री करणार्या नवीन भिमप्रसाद कोईराला (26) या वेटरला ताब्यात घेतले.
या वेळी पोलिसांनी वेटरकडे अधिक चौकशी केल्यानंतर बारचा मॅनेजर रमेश जोशी व रामनाथ ठाकूर यांच्या सांगण्यावरून दारूची विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी बारमधून हजारो रुपये किंमतीचा मद्याचा साठा जप्त केला. त्यानंतर दारूची विक्री करणार्या चौघांवर गुन्हे दाखल त्यांना ताब्यात घेतले.