केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी हल्लाबोल केला आहे. राहुलबाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत, असे म्हणत गृहमंत्री शाहा यांनी टीका केली.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून त्यांचा विदेशी टी शर्ट, ते मुक्काम करणार असलेला कंटेनर व त्यातील सुविधा, वादग्रस्त धर्म प्रसारक जॉर्ज पोन्नय्या यांची घेतलेली भेट आदी गोष्टींवरून राहुल हे ट्रोल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय की, राहुलबाबा नुकतेच भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत. ते परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत. राहुलबाबा आणि काँग्रेसजनांना त्यांच्या संसदेतील भाषणाची मी आठवण करून देतो. राहुलबाबा तेव्हा म्हणाले होते की भारत हे राष्ट्र नाही. अहो राहुलबाबा, कुठली पुस्तके वाचलीत? माँ भारती हे ते राष्ट्र आहे, ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे.
भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी भारत जोडो यात्रेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ही यात्रा म्हणजे वास्तवात एक द्वेषपूर्ण मोहीम. असल्याचे म्हटले, तर भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींच्या पक्ष आणि भारत जोडो यात्रेदरम्यान नवरात्रीच्या आधी मा शक्ती, मा भवानीचा अपमान करणारा व्हिडीओ समोर आला आहे. हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. यापूर्वीही असे अनेक प्रसंग आले आहेत. काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल यांनी हिंदू धर्माविरुद्ध अनेक वेळा अशोभनीय गोष्टी बोलल्या आहेत.