कर्जत ः बातमीदार
राज्य सरकारने दुसर्या लॉकडाऊनच्या काळात आता कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषद शहरातील सर्व नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणीत एखाद्या नागरिकात लक्षणे दिसल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली आहे.कोरोनाच्या लढाईत कर्जत नगर परिषदेने खबरदारी म्हणून बाहेरून आलेल्या अनेक जणांना होम क्वारंटाइन केले होते आणि त्याचे चांगले रिझल्ट आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. आता याही पुढे जाऊन कर्जत नगर परिषदेने नागरिकांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल स्टाफची कमतरता आहे. तरीही कर्जत नगर परिषद यापुढे उपजिल्हा रुग्णालयाच्या तीन नर्सेस आणि एक स्टाफ मेंबर यांना बरोबर घेऊन कर्जत शहरातील प्रत्येक वॉर्डमधील सहकार्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करणार आहे. याकामी उपजिल्हा रुग्णालयाची मोलाची मदत होत आहे. यासाठी नगर परिषदेला सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींचे सहकार्य अपेक्षित आहे. कुटुंबातील कोणी सदस्य आजारी असल्यास त्याची जागेवरच तपासणी होणार असून आवश्यकता भासल्यास संबंधित रुग्णाला पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.कोरोनाविरोधातील लढाईत कर्जत नगर परिषद कर्जतकर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शक्य तेवढी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करीत असून नागरिकांनीही याकामी सहकार्य करावे, असे आवाहन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.