माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात घरातच राहा. विनाकारण बाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने माणगाव पोलिसांनी माणगाव बाजारपेठेत फिरणार्या सुमारे 105 मोटरसायकलींवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे विनाकारण फिरणार्या वाहनचालकांना काही अंशी आळा बसला असून वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. ही वाहने लॉकडाऊननंतर संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून परत देण्यात येणार आहेत.
खोपोलीत एटीएममध्ये नोटांचा दुष्काळ
खोपोली ः बातमीदार
मोठ्या कालावधीच्या लॉकडाऊनमध्ये खालापूरकरांचा खिसा रिकामा झाल्यानंतर एटीएम सेंटरकडे धाव घेणार्या नागरिकांना एटीएममध्ये नोटांच्या दुष्काळामुळे बँकेत जाण्याची वेळ आली आहे. परिणामी बँकांबाहेर गर्दी वाढली आहे. लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालावधीमुळे अनेकांनी पुढच्या 15 दिवसांची तरतूद, दूधवाला, किराणा सामान, औषधे यासाठी पैशांची निकड असल्याने एटीएमकडे धाव घेतली, परंतु खालापुरातील एकमेव एटीएममध्ये रक्कम नसल्याने पंचाईत झाली आहे. खालापूर सोडून खोपोलीत एटीएम सेंटरला जाणे शक्य नसल्याने नागरिक वैतागले आहेत. शिवाय खालापुरात एकच राष्ट्रीयकृत बँक असून बँक ऑफ इंडियातही एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
आदिवासी, गरिबांना धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतमधील आदिवासी आणि गरीब कुटुंबांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने तेथील 200 कुटुंबांना कळंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाज बांधवांची लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये या हेतूने जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम झाला. ग्रामपंचायतीने सामाजिक जाणिवेतून ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांना धान्य तसेच सॅनिटायझरचे वाटप केले. ग्रामपंचायत सरपंच माधुरी बदे यांच्या हस्ते धान्यवाटप करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बदे, विठ्ठल बदे, लाला भातभरडे, तंटामुक्ती ग्राममोहीम अध्यक्ष आयुब कोईलकर, सदस्य किशोर धुळे, नरेश बदे, अशोक दहिवलीकर, गीता शेळके, नीलम ढोले, रूपेश वाघमारे, रेखा बदे आदी उपस्थित होते.
‘संत निरंकारी’कडून जीवनावश्यक वस्तू
माणगाव ः प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणारे तसेच गोरगरिबांचे हाल होत असल्याने सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांनी संपूर्ण देशात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रायगड झोन 40 (अ) अंतर्गत प्रत्येक शाखेत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा, चोरवली (ता. तळा) यांच्या वतीने चोरवली, गायमुख, तळेगाव, गणेशनगर, तळा, भानंग कोंड, कुडतुडी, कासेखोल, वांजलोशी, चरई, पाचघर, पिटसई, बार्पे, तारणे गावात जाऊन गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी गणेश राणे, शांताराम नटे, प्रकाश उभारे, परशुराम आडखळे, शिवराम कदम, अशोक राणे आदी उपस्थित होते.
धावटे आरोग्य उपकेंद्रात चोरी
पेण ः प्रतिनिधी
पेणमधील धावटे येथील आरोग्य उपकेंद्रात चोरट्याने डल्ला मारून तीन हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी काम करीत असलेल्या धावटे येथील आरोग्य उपकेंद्रात सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्याने इमारतीच्या दरवाज्याची कडी उघडून आत प्रवेश केला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस नाईक पवार अधिक तपास करीत आहेत.