रोहे ः प्रतिनिधी
शेतकर्यांचा आंबा विक्रीसाठी कोकणातील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारावी. याच धर्तीवर कोकणाच्या शेजारी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी शासनाच्या पणन विभागाच्या सहकार्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवून सकाळी दोन व सायंकाळी दोन तास वेळ ठरवून आंबा विक्री करण्यासाठी विक्री केंद्र उभे करावे, अशी मागणी महाराष्ट्र आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. कोकणातील हापूस आंबा 40 ते 50 टक्के तयार झाला आहे. या आंब्याची ठोक विक्री एपीएमसी, पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे 50 ते 55 टक्के व उर्वरित महाराष्ट्रात, स्थानिक बाजारपेठेत, आठवडा बाजार, मॉलमध्ये रिटेल सेक्टरमध्ये 30 टक्के व उर्वरित 15 टक्के माल परदेशात निर्यात होतो, मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विक्री व्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगडातील आंबा झाडावरच खराब होणार आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान, आंबा उत्पादक शेतकर्यांचा आंबा विक्री करण्यासाठी आपण योग्य ती यंत्रणा राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पणनमंत्र्यांनी दिल्याचे मोकल यांनी सांगितले.