चौल-आग्राव ग्रामस्थांकडून नियमांचे पालन
अलिबाग : रामप्रहर वृत्त
दरवर्षी चैत्र सप्तमी या दिवशी श्री क्षेत्र कार्ला येथे एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असतो. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अखंड परंपरेला या वर्षी मात्र खंड पडला आहे. यंदाच्या वर्षी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्रात 144 कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्यावर्षी एकवीरा देवीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला. अनेक गावांतील पालख्या या कार्ल्याला जात असतात, मात्र पहिला मान असलेल्या अलिबाग तालुक्यातील चौल-आग्राव या गावात पंचांच्या पाचजणांनी पूजन करुन एकवीरा देवीचा मान पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत करीत देवीकडे सर्वांना सुखी ठेव, सर्वांना रोगमुक्त कर, अशी प्रार्थना केली. ग्रामस्थांनी याप्रकारे शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. चौल-आग्राव येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या नियमांचे पालनही झाले व वर्षानुवर्षे चालत आलेल्या एकवीरा देवीची परंपराही सुरु राहिली.