Breaking News

गांभीर्य आवश्यक

अमेरिका, युरोपातील कोरोना बळींचे आकडे भयावह आहेतच, पण आपल्या राज्यातील स्थितीही काही कमी गंभीर नाही. मुंबई, पुण्यातील स्थिती विशेष चिंताजनक आहे, परंतु तरीही या शहरांत तसेच अन्यत्र अद्यापही सर्वसामान्य कोरोनासंबंधात तितकेसे गंभीर दिसत नाहीत. कधी बदलणार ही स्थिती?

महाराष्ट्रातील कोरोनासंबंधीची स्थिती निश्चितच दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. संपूर्ण देशात मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर आणि कोलकाता येथील स्थिती विशेष गंभीर असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशातील 80 टक्के कोरोनाबाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तीही एक मोठी चिंतेची बाब वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे. अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या 45 हजारांवर गेली असून यापैकी जवळपास निम्मे एकट्या न्यूयॉर्क शहरातील आहेत. इटली आणि स्पेनमधील मृतांची 20 ते 30 हजारांच्या घरातली संख्याही अशीच छाती दडपवणारी आहे. जगभरात कोरोनाचे थैमान हे असे सुरूच असताना महाराष्ट्रातील आकडाही सोमवारी संध्याकाळी 4482 पर्यंत जाऊन पोहचला. मुंबई, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. विशेष म्हणजे मुंबईतील 53 पत्रकारांचे तसेच महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील दोघा कर्मचार्‍यांचेही कोरोना चाचणी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. एकीकडे मुंबईतील कोरोनासंबंधी स्थिती अधिकाधिक गंभीर होत असतानाच लॉकडाऊनसंबंधी निर्बंध शिथिल होताच  शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी दिसून आली. राज्याच्या इतरही अनेक भागांमध्ये आजही कोरोनासंबंधी पुरेसे गांभीर्य दिसत नाही. अनेक ठिकाणी लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले वा विनाकारण हिंडताना दिसतात. एकीकडे ही स्थिती तर निर्बंध शिथिल करूनही अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये मात्र सोमवारी शुकशुकाटच दिसला. कामगारांची तिथेच राहण्याची सोय करावी वा त्यांची बसने ने-आण करावी यांसारख्या अटींमुळे हा अनुत्साह आहे. राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे सातत्याने वाढतच असताना अनेक संशयित रुग्ण आजही समाजाकडून वाळीत टाकले जाण्याच्या भीतीपोटी आपली कोरोनासदृश लक्षणे दडवत असावेत, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. कोरोनाची लक्षणे सर्दी, कोरडा खोकला, ताप ही सर्वसामान्यत:ही आढळत असल्यामुळे लोक गोंधळून जात असावेत. खेरीज तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यास तिथेच अन्य कुणाकडून आपल्याला संसर्ग होईल की काय अशी भीती वा खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी मोजावी लागणारी मोठी रक्कम या दोन्हींमुळे सर्वसामान्य नागरिक चाचणी टाळत असावेत असे वाटते. कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यास नागरिकांनी ती न लपवता चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे, परंतु निव्वळ आवाहनामुळे लोक पुढे येतील असे वाटत नाही. त्यासाठी टेस्टिंग अधिकाधिक सहजपणे उपलब्ध असण्याची गरज आहे. दुसरीकडे लोक मोठ्या प्रमाणात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्दी, खोकला, ताप यांवरील औषधे खरेदी करीत असल्यामुळे अनेक राज्यांतील सरकारी यंत्रणांनी ही औषधे खरेदी करणार्‍या ग्राहकांचे फोन नंबर व पत्ते नोंदवून घेण्यास औषध दुकानदारांना सांगितले आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचादेखील समावेश आहे. लॉकडाऊनचे निर्बंध हे निव्वळ आर्थिक व औद्योगिक व्यवहारांना थोडीफार चालना मिळावी याकरिता शिथिल करण्यात आले आहेत. आपण किंचितही गाफील होण्यासारखी परिस्थिती राज्यात तरी अजिबातच नाही. जबाबदारीने वागलो तरच लॉकडाऊनमधून लवकर सुटका होईल हे प्रत्येकाने ध्यानात घेण्याची गरज आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply