सात जणांच्या टेस्ट निगेटिव्ह; जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू
कर्जत ः बातमीदार – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यावर आलेले कोरोना संकट सध्या तरी टळले असून गेली चार दिवस लॉकडाऊन असलेल्या नेरळ आणि कर्जत येथील बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता उघडल्याने बाजारात गर्दी फुलली होती.
ठाणे येथे उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबीय तसेच त्याचे दोन सहकारी यांच्या प्रशासनाच्या वतीने कोरोना टेस्ट करून घेण्यात आल्या. 20 एप्रिल रोजी त्या तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच दिवशी नेरळ गावातील त्या तरुणाच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाने कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी पाठवले होते, तर त्याआधी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना कोरोना टेस्ट करायला धाडण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या कंपनीमधील नेरळजवळ असलेल्या गावात राहणार्या त्याच्या सहकार्यालादेखील 21 एप्रिल रोजी कोरोना टेस्टसाठी नेण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या कंपनीत त्याच्यासोबत असलेल्या कर्जत शहराजवळ असलेल्या गावातील
तरुणालाही टेस्टासाठी नेण्यात आले होते. या दोन्ही तरुणांच्या कोरोना टेस्ट 24 एप्रिलपर्यंत निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे नेरळसह कर्जत तालुक्याचे कोरोनाचे टेन्शन कमी झाले आहे. या सर्व सात जणांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर कर्जतसोबत मुरबाड तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका टळला आहे.
सर्वांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी (दि. 25) आधी जाहीर केल्याप्रमाणे नेरळ व कर्जतमधील जीवनावश्यक
वस्तूंची दुकाने उघडली आहेत. नेरळ ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून चार दिवस सर्व व्यवहार बंद ठेवले होते, तर कर्जत नगरपालिका हद्दीमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही 24 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. चार दिवसांनी नेरळ, कर्जत येथील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. नेरळ परिसरातील 25-30 गावांची बाजारपेठ नेरळ असल्याने सकाळपासून रस्ते फुलले होते. नेरळ व कर्जत शहरात पोलिसांनी कोणीही दुचाकी घेऊन येऊ नये, असे आदेश दिल्याने तुरळक बाइक दिसत होत्या, मात्र खबरदारी म्हणून कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 25 एप्रिलपर्यंत, तर कशेळे व कळंब येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. कर्जत व नेरळ बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू झाली आहेत, पण ग्रामीण भागातील दुकाने अजूनही बंद आहेत.
एका तासात भाजी संपली
सकाळपासूनच कर्जत बाजारपेठेत एकच गर्दी झाली होती. चार दिवसांनी किराणा, दूध डेअर्या, भाजीची दुकाने उघडल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. अवघ्या एका तासात येथील सर्व भाजी संपली. जसे काही सर्वच सुरळीत झाल्यासारखे वाटत होते.