16 नागरिकांची अतिदक्षता टीम सज्ज
कडाव ः वार्ताहर – भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायती कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील मांडावणे ग्रामपंचायतीने वेगळी शक्कल लढवत आपल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीमधील 16 नागरिकांची अतिदक्षता टीम तयार करून तिचे चार भाग बनवून जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आले आहे.
कर्जतमधील मांडावणे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गोरगरीब जनतेच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून, ग्रामपंचायत हद्दीत दर आठ दिवसांनी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. गावाबाहेर जाणार्या नागरिकांना वारंवार
दक्षतेच्या सूचना देण्यात येत आहेत, तसेच पुणे-मुंबई आदी ठिकाणावरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात
आले आहे.
विशेष म्हणजे मांडावणे ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदी प्रमुख 16 लोकांची अतिदक्षता टीम कार्यरत करण्यात आली असून मांडावणे ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी, आंबेवाडी, दलित वस्ती आणि मांडावणे गाव या चार ठिकाणी प्रत्येकी चार-चार जणांचे गट तयार करून त्यांची अतिदक्षता टीम तयार करून ग्रामपंचायतीने पुढाकार घेत आपल्या परिसरातील सर्व नागरिकांचे रक्षण करण्याचे कार्य केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी नागरिकांकडून करण्यात यावी तसेच नागरिकांनी आपल्या घरी राहूनच कोरोनाविरोधी लढाईला पाठिंबा द्यावा. तरच आपण या लढाईत विजयी होऊ. म्हणूनच आमच्या ग्रामपंचायतीत 16 जणांची अतिदक्षता टीम तयार करण्यात आली असून, ती नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.
-पुष्पा आगज, सरपंच, मांडावणे ग्रामपंचायत