लाखो वर्षांपूर्वी कधीतरी मानव प्राणी जन्माला आला व त्यानंतरची हजारो वर्षे तो पायी, फार फार तर प्राण्यांच्या पाठीवर बसूनच प्रवास करीत होता. विज्ञान-तंत्रज्ञानाने प्रगती केली व प्रवासासाठी अत्याधुनिक वाहने आली. हा वेग व हे तंत्रज्ञान कितीही उपयोगी ठरणारे असले तरी याचे ‘बाय प्रॉडक्ट्स’ असल्यासारखे अपघात व दुखणीही त्यामागोमाग आलीच. दुचाकी, चारचाकी किंवा बसमधूनही आपण रोजच प्रवास करतो. या प्रवासात आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे अपघात झालाच तर आपल्या शरीरावर गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात.
स्लीपर कोच गाड्यांचा प्रवास
रात्री प्रवास करताना अनेकदा आपण स्लीपर कोचचा पर्याय स्वीकारतो. स्लीपर कोचमध्ये अनेकदा दोन प्रवाशांची जागा पार्टिशन टाकून विभागली जाते. स्लीपर कोचमधून प्रवास करताना घ्यायची खबरदारी म्हणजे नेहमी बसचालकाच्या दिशेने पाय करून झोपावे. अनेकदा पुरेशा माहितीच्या अभावामुळे आपण स्लीपर कोचमध्ये चालकाच्या दिशेने डोकं करून झोपतो. महामार्गावरच्या प्रवासात भरधाव वेगात असताना अचानक अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपत्कालीन ब्रेक लावला जातो. अशा परिस्थितीत चालकाकडे डोकं करून झोपल्यामुळे डोकं मधल्या पार्टिशनवर आपटून मानेला झटका बसतो व कित्येक दिवस त्रास सहन करावा लागतो. अपघाताची तीव्रता याहून अधिक असली तर मेंदूला व पर्यायाने मज्जासंस्थेला इजा होते. मज्जारज्जू हा नाजूक अवयव दुखावला तर त्यातून अपंगत्व आलेले, सर्व संवेदना हरवलेले किंवा गंभीर परिस्थितीत असलेले रुग्ण सध्या अनेक रुग्णालयांकडे येताना दिसतात.
चारचाकी गाड्यांचा प्रवास
जे महत्त्व दुचाकी चालवणार्यांसाठी हेल्मेटचे आहे, तेच महत्त्व चारचाकी चालवणार्यांसाठी सीट बेल्टचे. सीट बेल्टमुळे अपघाताच्या परिस्थितीत शरीर गाडीच्या डॅशबोर्डवर आपटणे, खिडकीची काच फुटून बाहेर फेकले जाणे यापासून संरक्षण होते. चालक किंवा मागे बसलेले प्रवासी यांचे डोकं पुढच्या डॅशबोर्डवर किंवा सीटवर आपटल्यामुळे मानेच्या मणक्याला व्हीप्लॅश नावाची दुखापत होते. सीट बेल्ट पोटाला घासून दुखापत होते, अशा सबबी अनेक प्रवासी देतात, मात्र अपघात होऊन जीव गमावणे किंवा कायमचे अपंगत्व येणे यापेक्षा पोटाच्या दुखापती सहज बर्या करता येणे शक्य आहे.