Breaking News

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात बुधवारी (दि. 29) झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील नागरिकांच्या घरांची कौले व आंबा बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे.

रोहा तालुक्यातील काही भागात बुधवारी संध्याकाळी वादळी वार्‍यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे आंबा बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी रोहा तालुक्यात 35 मिलीमीटर पाऊस पडला असून वार्‍याच्या प्रचंड वेगामुळे अनेक झाडे तसेच विजेचे खांब कोसळल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. अतिवृष्टी, पूर, त्यापाठोपाठ कोरोना, आता पुन्हा अवकाळी पाऊस यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक घरांचे पत्रे, कौले उडाली असून कच्च्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी भातपिकाचे नुकसान झाले. मत्स्यशेतीला आणि आंब्याच्या बागांनादेखील याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे चाकरमानी तसेच स्थानिक कामगारांच्या हाताला काम नाही. वीटभट्टी व्यावसायिक मालाला उठाव नसल्याने चिंतेत असताना बुधवारी झालेल्या पावसाने त्यांच्या सर्व मेहनतीचा चिखल झाल्याचे दिसून येत आहे. विजेचे पोल व तारांचेही नुकसान झाले असून अनेक ठिकाणचा वीजपुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही.

रोह्यात चक्रवादळात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. रोहा तालुक्यात सात महसुली मंडळाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. रोह्यात 1193 घरांचे चक्रवादळ व अवकाळी पावसामुळे कौले व पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली.

रोहा तालुक्यात चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांच्या माध्यमातून आंबा नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. 33 टक्के आंबा बागायतदारांचे नुकसान झाले असून तालुक्यात 121 गावांमधून 769 शेतकर्‍यांचे 658.49 हेक्टरवरील  आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply