Breaking News

साळाव पुलाला बार्जची धडक; चालकावर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी

साळाव पुलाला राधाकृष्ण-3 या बार्जने शुक्रवारी (दि. 8) धडक दिल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. बार्जने साळाव पुलास दिलेल्या धडकेची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेतली आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून बार्जचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव पुलास बार्जने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास धडक दिल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अधिकारी राहुल बागूल दुपारी रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज पो.नि. सुनील जैतापूरकर व पोलीस कर्मचार्‍यांसह साळाव पुलानजीक पिअर क्रमांक 4, 5 येथे पोलीस गस्ती बोटमधून पोहचले. या ठिकाणी  पिअर क्रमांक 4, 5ला आयएमओ. 8654687 या क्रमांकाची राधाकृष्ण-3 मुंबई ही बार्ज अडकलेली दिसली. या वेळी बार्ज व पुलाची पाहणी केली असता साळाव पुलाच्या पिअर क्रमांक 4,5मध्ये अडकलेली बार्ज पाण्याच्या भरतीच्या प्रवाहाने पिअरला धडक देत होती. त्यामुळे पिअर कॉकेटचे नुकसान होऊन पिअर बेअरिंग कॅपला तडे गेल्याचे आढळले. तसेच पुलाच्या मुख्यः डांबरी रस्त्याला प्रसरण साध्यावरील पृष्ठभागाला बार्जच्या धडकेने बसलेल्या हादर्‍याने भेगा पडलेल्या दिसल्या. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात बार्जचालकाविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच इतर कारणांवरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अधिकारी राहुल बागूल यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात बार्जचालकाविरोधात 280, 427सह सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक कायदा 1984 कलम 3अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पो. नि. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply