कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही स्वतःची शैक्षणिक संस्था असली, तरी त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे रयत संस्थेला मातृसंस्था मानून ते सदैव कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आले. रयतेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे हे सर्वश्रुत आहे. चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात, शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे, या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय कार्य करीत आहेत. रयत आणि ठाकूर कुटुंबीय यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना ‘कमवा आणि शिका’ या योजनेत त्यांना मिळाले होते आणि त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. त्यामुळे रयतेच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ उभारण्यात आले आहे. या भवनाचे उद्घाटन सोमवारी होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.