Breaking News

अफवांवर विश्वास ठेवू नका; प्रांताधिकार्‍यांचे आवाहन

माणगाव ः प्रतिनिधी

संपूर्ण जगभरात हैदोस घालणार्‍या जीवघेण्या कोरोना विषाणूपासून अजूनपर्यंत माणगाव तालुका सुरक्षित असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दिघावकर म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी माणगावमधील एका खासगी रुग्णालयात महाड तालुक्यातील कोकरे गावातील  एका 63 वर्षीय वयोवृद्ध इसमाला पॅरेलिसिसमुळे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर 7 मे रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, मात्र त्यांना सुका खोकला, सर्दी अशी लक्षणे दिसत असल्याने त्यांची लॅब चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 10 मे रोजी या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण माणगाव शहर अथवा तालुक्यात आढळलेला नाही. त्याचे मूळ गाव महाड तालुक्यातील कोकरे आहे. त्यामुळे माणगाव तालुका अजूनपर्यंत सुरक्षित आहे.

या रुग्णाच्या चर्चेनंतर माणगावमधील दुसर्‍या एका रुग्णालयात 10 मे रोजी कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा सर्वत्र पसरली. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तोंडाला मास्क लावा.  सुरक्षित राहा. आतापर्यंत ज्याप्रमाणे माणगाव तालुक्यातील जनतेने सरकार व प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, तसेच सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply