मँचेस्टर : वृत्तसंस्था
मिशन वर्ल्डकपवर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी असून जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत आहे. भुवीने आज नेटमध्ये 30 ते 35 मिनिटे गोलंदाजीचा कसून सराव केला. भुवीने पूर्ण रन अप घेऊन गोलंदाजी केल्याने तो गुरुवारी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्टइंडिजविरुद्ध होणार्या सामन्यात खेळू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
भुवनेश्वर कुमारने आज फिजिओ पॅट्रिक फरहाट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. सुरुवातीला छोटा रन अप घेऊन त्याने गोलंदाजी केली. त्यानंतर पूर्ण रनअप घेऊनही त्याने गोलंदाजीचा सराव केला. या वेळी कर्णधार विराट कोहलीही हजर होता. यादरम्यान भुवीला गोलंदाजी करताना काहीच त्रास जाणवत नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. भारतीय संघासाठी ही फार मोठी दिलासादायक बाब आहे.