कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तालुक्याच्या सर्वच भागांत आता रुग्ण आढळत आहेत. कर्जत शहरातील संजयनगर भागात आढळलेल्या 43 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे कर्जत तालुक्यातील रुग्णसंख्या सहावर पोहचली आहे. सहावा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कर्जत शहरात आढळल्याने आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून दूर असलेल्या कर्जत शहरातील नागरिक दहशतीखाली आले आहेत. पालिकेने रुग्णाचे वास्तव्य असलेल्या इमारतीचे निर्जंतुकीकरण केले आहे.
कर्जत शहरातील संजयनगर भागात राहणारी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कर्जतहून मुंबईतील गोवंडी भागात नोकरीसाठी जात होती. त्यांना दोन मुले असून लॉकडाऊन सुरू होण्याआधी दोन्ही मुले कोकणातील गावी चिपळूण येथे गेली आहेत. ही व्यक्ती पत्नीसह मुंबईत राहत होती. 17 मे रोजी सदर व्यक्ती कर्जत येथील घरी आली, मात्र 18 मे रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 19 मे रोजी त्यांचे स्वॅब घेण्यात येऊन त्यांना पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर कर्जत तालुका प्रशासनाने कर्जत शहरातील संजयनगर परिसराचा ताबा घेतला.
ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सध्या पनवेल, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात आहे, तर घरी त्यांची पत्नी असून त्यांच्या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात मागील आठ दिवसांत किती लोक आले याची माहिती कर्जत नगर परिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय घेत आहे. त्याच वेळी पालिकेने तत्काळ संजयनगर भागातील पूजन पॅलेस इमारत आणि परिसर निर्जंतुक करण्यावर भर दिला आहे. दुपारपासून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांची टीम त्या इमारतीमधील आणि तेथून 500 मीटर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाबद्दल माहिती मिळताच प्रशासन तेथे पोहचले असून प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बनसोडे तसेच कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी त्या ठिकाणी पोहचले आहेत.
दरम्यान, कर्जत शहरातील संजयनगरमधील व्यक्ती ही कर्जत तालुक्यातील सहावी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. त्यातील तीन पूर्णपणे बरे होऊन घरी आले आहेत. एका व्यक्तीचा शरीरातील अन्य व्याधींबरोबर झालेल्या कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर एक 63 वर्षीय महिला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.