कर्जत ः बातमीदार
नेरळजवळील अवसरे येथे नातेवाईकांकडे आलेल्या मुंबई घाटकोपर येथील 19 वर्षीय तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह सोमवारी (दि. 23) दुसर्या दिवशी नदीकिनारी बाहेर आल्यानंतर तो पोलिसांनी शवविच्छेनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. इम्तियाज अहमद हलीम खान (वय 19) असे मयत तरुणाचे नाव असून तो नातेवाईकांकडे अवसरे येथे आला होता. रविवारी दुपारी हा तरुण अन्य चार जणांसह उल्हास नदीत पोहण्यासाठी गेला होता, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील इम्तियाज व अन्य एक जण खोल पाण्यात बुडू लागले. या वेळी एक तरुण इतरांच्या मदतीने बाहेर आला, मात्र इम्तियाज बुडाला. कामगार आणि स्थानिकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तसेच नेरळ पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या टीमला पाचारण केले, पण अंधार पडल्याने रेस्क्यू थांबवण्यात आले. अखेर सोमवारी सकाळी 7.30 वाजता इम्तियाज खानचा मृतदेह नदीच्या कडेला आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तो नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. गतवर्षी याच भागात शेलू येथील चाळीत राहण्यासाठी आलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला होता.