Breaking News

मोदी लाट कायम

लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांत भाजपने विजय मिळविला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. एवढे पक्ष एकत्र आल्याने आता आम्हीच जिंकणार असा त्यांचा अविर्भाव होता. अर्थात, या आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या असून काँग्रेस घटक पक्षांना डावलत असल्याच्या तक्रारी आहेत. तरीदेखील काँग्रेसने सर्वकाही रेटून नेत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र एवढे पक्ष एकवटूनदेखील भाजपला मात देता आली नाही. उलट भाजपने मध्य प्रदेश राखतानाच राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहेत, तर तेलंगणामध्ये बीआरएसची पीछेहाट होऊन काँग्रेसने बस्तान बसवले आहे. उर्वरित मिझोराम राज्यातील मतमोजणी व निकाल सोमवारी आहे. चार राज्यांचा निकाल भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारा आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत. हिंदी भाषक पट्ट्याचा कौल भाजपच्या बाजूने लागला असल्याने लोकसभेचा जादुई आकडा गाठताना कमळ फुलण्यासाठी अनुकूल वातावरण असेल. दुसरीकडे काँग्रेसने राज्यस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये गमावली असून एकमेव तेलंगणात पाय रोवले आहेत. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेतील लोकसभेच्या जागा कमी आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण भारतात प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेलंगणात काँग्रेसने विजय मिळविला असला तरी उत्तरेतील हार त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. काँग्रेसने आपले घोडे पुढे दामवटत या निवडणुका लढविल्याने इंडिया आघाडीतील समाजवादी पक्षांसारखे सहकारी नाराज झाले होेते. आघाडीतील वाद निकालानंतर चव्हाट्यावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. शिवाय विधानसभा निवडणुकांमध्ये दिलेल्या सापत्न वागणुकीची परतफेड घटक पक्ष लोकसभा निवडणुकीत करतील हे वेगळे सांगायला नको. तसे झाल्यास ते काँग्रेसला जड जाऊ शकते. कधी काळी देशात सर्वांत मोठा असलेला काँग्रेस पक्ष 2014पासून उतरणीला लागला आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेसला धार्जिणी नसल्याने बिगरगांधी घराण्यातील अध्यक्ष केला गेला. असे असले तरी पक्षाची सर्व कमान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडेच आहे. राहुलबाबांच्या भारत जोडो यात्रेनंतर काँगे्रसला चांगले दिवस येणार असे मानले जात होते, मात्र पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देशात केवळ मोदी हा एकच ब्रँड कायम चालतो हे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदींची के्रझ, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची चाणक्यनीती, त्याला इतर नेत्यांची जोेड, त्या त्या राज्यांतील नेते, पदाधिकार्‍यांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांची मेहनत या जोरावर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार याची झलक दाखवून दिली आहे. भाजपने अत्यंत शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा राबविली. दुसरीकडे काँग्र्रसने पंतप्रधान मोदींवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका-टिपण्णी केली, जी त्यांना भोवली आहे. मागील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळीही राहुल गांधींनी अशाच प्रकारे पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. तिच चूक त्यांनी पुन्हा केली. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? पंतप्रधान मोदी मात्र लोकसभेसाठी नव्या जोमाने सज्ज होत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply