कामोठे, तळोजातील महिलांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. कामोठ्यात पाच, कळंबोलीत चार, नवीन पनवेलमध्ये तीन आणि तळोजा फेज-1 येथे एक नवीन रुग्ण आढळला, तर 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे पनवेल ग्रामीणमध्ये दिवसभरात एकही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. पनवेल तालुक्यात कोरोनाचे आतापर्यंत 421 रुग्ण झाले असून, जिल्ह्याचा आकडा 590वर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला रक्तदाबाचाही त्रास होता. त्याचप्रमाणे तळोजा फेज-1 अमर फार्मोनी येथील 63 वर्षीय महिला मृत्युमुखी पडली. तिला मधुमेहही होता. या दोन्ही महिलांचा 19 मे रोजी मृत्यू झाला असल्याचे महापालिकेने अहवालात म्हटले आहे. कामोठे सेक्टर 7मध्ये कोरोनाचे सात रुग्ण आढळले असून, यात श्रीराम आर्केडमधील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. या कुटुंबाच्या प्रमुखचा एपीएमसी मार्केटमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. एका सायन हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आणि सेक्टर 12मधील नर्सचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.
कळंबोलीत चार नवे रुग्ण आढळले असून, सेक्टर 15मधील ब्लॅक स्मिथ कॉर्नर येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घरातील एका सदस्याला यापूर्वी कोरोना झालेला आहे. सेक्टर 12 मधील झोपडपट्टीतील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 13, ए टाईप येथील वसंत निवासमधील एकाच घरातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या घरातील दोघांना कोरोना झालेला आहे. सेक्टर 9 येथील धनलक्ष्मीमधील रहिवासी व मुंबई महापालिकेचा सफाई कामगाराला कोरोनाची संसर्ग झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारपर्यंत कोरोनाच्या 2014 टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 50 जणांचे अहवाल बाकी आहेत. एकूण 305 रुग्णांपैकी 151 जणांनी कोरोनावर मात केल असून, 142 जणांवर उपचार सुरू आहेत.