पनवेल : प्रतिनिधी
हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्रद्वारा 48वी महिला महाराष्ट्र राज्य हॅण्डबाल अजिंक्यपद स्पर्धा पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड संघाने नागपूरचा पराभव करीत तृतीय क्रमांक पटकाविला.
राज्यभरातून तब्बल 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत सांगली, ठाणे या संघांवर मात करीत रायगड संघाने उपांत्यपूर्व फेरीत स्पर्धेचा संभाव्य विजेता समजला जाणार्या भंडारा संघाचा चार गोलने पराभव केला. उपांत्य फेरीत पुणे संघाकडून दोन गोलने रायगडचा पराभव झाल्यावर तृतीय क्रमांकासाठीच्या सामन्यात नागपूर संघावर दोन गोलने रायगडने विजय साकारला.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केल्यामुळे शैला भंडारी व प्रतिमा पाटील यांची 22 ते 27 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
विजयी संघास प्रशांत महल्ले, संगम डंगर, प्रज्ञानंद कांबळे, नितीन घारे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे जिल्हा हॅण्डबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, संघटनेचे उपाध्यक्ष विनोद नाईक, चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्हाटे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे आदींनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.