Breaking News

मुख्यमंत्री ’मातोश्री’त क्वारंटाइन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

कोल्हापूर ः प्रतिनिधी
राज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले नाही. ते सपशेल अपयशी ठरले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी स्वतःला ’मातोश्री’मध्ये कोंडून घेत स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. कोल्हापुरात गुरुवारी (दि. 21) चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होेते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारविरोधात शुक्रवारी (दि. 22) भाजप ’मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली.
मास्क घालून, हातात ग्लोव्हज घाला, एवढंच नाही तर दुहेरी पीपीई किट घालून संकटाशी मुकाबला करण्यासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. मुख्यमंत्र्यांसारखा नेता स्वतःला कोंडून घेत असेल, तर सामान्यांचे काय? मलाच पुण्याहून कोल्हापूरला यायला दोन दिवस लागले, तर सर्वसामान्यांचे काय, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या महाराष्ट्र हे प्रशासकीय अधिकारी चालवत आहे. राज्यातील कोरोना संकट निवारणात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. संकटसमयी मुख्यमंत्र्यांनी खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर द्यायला हवा होता, मात्र त्यांनी बचावात्मक भूमिका घेत स्वत:ला ‘मातोश्री’मध्ये कोंडून घेतले आहे. आमदारांची, नगरसेवकांची बैठक मुख्यमंत्री का घेत नाहीत, असा सवालही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
असा करा राज्य सरकारचा निषेध
राज्यातील ठाकरे सरकारविरोधात भाजप शुक्रवारी ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे महाराष्ट्र बचावाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला. तसेच हातावर पोट असणार्‍यांना मदत केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply