पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी (दि. 24) डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाविद्यालयात कर्मवीर सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम झाले.
कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनिजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व सहसचिव (ऑडिटर) प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित होते.
अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांना संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेशी असणारे ऋणानुबंध व्यक्त करीत कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज व महात्मा गांधी यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे तसेच साधी राहणी व उच्च विचारसरणी अंगीकारल्यास जीवनामध्ये यशस्वी होता येते, असे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होण्यासाठी कला व क्रीडेस शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. स्वावलंबी शिक्षण हे कर्मवीरांचे व्रत विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मवीरांचे योगदान खूप मोठे असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य क्रांती केली. ज्ञानाची गंगा गोरगरीबांपर्यंत पोहचविली. कर्मवीरांनी नानाविध समस्यांना सामोरे जात रयतेच्या शिक्षणाचा धनुष्य यशस्वीरित्या पेलला. त्यांनी समाजासाठी केलेला त्याग, त्यांची निस्पृहपणे केलेली सेवा याची आपण आठवण ठेवली पाहिजे व आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने केले पाहिजे.
सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक व्यक्ती हा आदर्श माणूस, आदर्श शिक्षक व आदर्श नागरिक झाला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांची चरित्रे वाचून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत व परिचय करून दिला तसेच आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून संस्थेच्या सर्वच महाविद्यालयांनी नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले. त्यांनी या वेळी नवीन शैक्षणिक धोरणावरही विचार व्यक्त केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, डी.बी. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.ए. पाटील, डॉ. एन.बी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर व डॉ. यशवंत उलवेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.ए. पाटील यांनी मानले.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …