पनवेल ः रामप्रहर वृत्त
लाडकी बहीण योजनेसह लोकहिताच्या अनेक योजना राज्यात सुरू आहेत. या योजना अशाच सुरू राहण्यासाठी राज्यात विद्यमान भाजप महायुतीचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी आपली ताकद येत्या विधानसभा निवडणुकीतही लावून आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी आणि गोवा राज्य महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी येथे केले.
भाजप उत्तर रायगड महिला पदाधिकारी यांची बैठक मंगळवारी (दि. 24) पनवेल येथे झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना सावंत बोलत होत्या. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्रमोती, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस संध्या शारबिद्रे, पनवेल तालुका अध्यक्ष कमला देशेकर, शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर यांच्यासह जिल्हा व मंडलातील पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
या वेळी सुलक्षणा सावंत यांनी महिला पदाधिकार्यांकडून कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांना सहज आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, महिला सर्व क्षेत्रात जबाबदारीने काम करत असतात, त्याचप्रमाणे राजकारणात महिला मोर्चाची ताकद मोठी आहे. तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली आहे ती तुमच्यामध्ये असलेल्या क्षमतेमुळे. ही ताकद विजयाचा झेंडा डौलाने फडकवणार आहे. सहा लाख 74 हजार मतदार असलेला पनवेल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत पनवेलने मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थितरीत्या आणि गाफील न राहता काम केल्यास जिल्ह्यातील तीनही ठिकाणी आपल्याला विजय मिळवता येईल.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, भाजप खोलवर रूजलेला पक्ष आहे. त्यामुळे पक्ष लोकहिताचे निर्णय घेऊन सक्षमपणे काम करत आहे आणि त्याच अनुषंगाने पक्ष संघटनेसाठी अपेक्षित असलेले काम महिला मोर्चाच्या वतीने होत आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …