रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
पुणे ः प्रतिनिधी
राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, या विभागांत आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडातील महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दस्तुरी नाका ते नातेखिंड या मार्गावर नदीचे पाणी आले आहे.
पुढील 48 तास मुसळधार कायम
कोकणात रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. रायगडमध्ये गुरुवारी सकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे रोहा, नागोठणे आणि आपटा परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाण जनजीवन विस्कळीत झाले. महाड तालुक्यातील सावित्री, काळ, आणि गांधारी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सावित्री नदीचे पाणी दस्तुरी नाका ते नातेखिंड या मार्गावर येताच एकच धावपळ उडाली. भोईघाट येथे स्वयंचलित पाणी पातळी मोजणी बसवल्याने ठराविक अंतराने आपत्कालीन कक्षाकडून नागरिकांना कळवले जात आहे.
नागोठण्यात सहा जणांना वाचविले
आंबनदीने बुधावरी सायंकाळी जोरदार पावसात धोक्याची पातळी ओलांडल्या मुळे जागोजागी पूर परिस्थिती निर्माण झाली होती ग्रामीण भागात देखील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते यामुळे पळस येथे उदरी पकडण्यासाठी गेलेले सहा तरुण पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. या तरुणांना वाचवण्यात पोलीस प्रशासनाला व रेस्क्यू टीमला यश आले आहे.
पेणमध्ये घरांच्या भिंती कोसळल्या
पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पेण शहरातील एसटी स्थानक, कोळीवाडा, चिंचपाडा, विठ्ठलआळी, कारमेल स्कुल, महाडीकवाडी, पामबीच रोडसह तालुक्यातील अंतोरे, खरोशी, तांबडशेत आदी गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे.
कोकण रेल्वेमार्गावर मातीचा भराव
कोकण रेल्वेमार्गावर मातीचा भराव आल्याने मुंबई-मडगाव-मांडवी एक्स्प्रेस खोळंबली होती. त्यामुळे खेड रेल्वेसानकावर पुढील सूचना मिळेपर्यंत तिकीट विक्री थांबविण्यात आली. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची गैरसोय झाली.